GRAMIN SEARCH BANNER

हातखंबा येथे डंपर उलटून स्विफ्ट कारवर कोसळला, सहा जण गंभीर जखमी

Gramin Varta
445 Views

रत्नागिरी :- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर शनिवारी (दि. १३) दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गरम डांबरमिश्रित खडी घेऊन जाणारा भरधाव डंपर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन उलटला आणि मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर कोसळला. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की डंपरमधील गरम खडी थेट कारवर पडली. त्यामुळे स्विफ्ट कार पूर्णपणे खडीखाली सापडली असून वाहन खडीने अक्षरशः झाकले गेले होते. या घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्र. एमएच-०८-एपी-५६५२) दाभोळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. हातखंबा दर्गा येथील चढावावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर उलटला. त्याच वेळी सातारा–रत्नागिरी मार्गावरून येणारी स्विफ्ट कार (क्र. एमएच-११-एव्ही-९८२४) डंपरखाली सापडली.

या अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील असून त्यामध्ये प्रज्ञा नितीन जाधव (२९), स्पृहा नितीन जाधव (६), वृंदा नितीन जाधव (४), नितीन जाधव (वाहनचालक), ऋषिकेश राजेंद्र शिंदे (२६) आणि ऋतुजा राजेंद्र शिंदे (२३) यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, डंपर चालक विपूल थावरा दामोर (मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून सदर डंपर रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीचा असल्याची माहिती पुढे येत आहे.

या परिसरात मुंबई–गोवा तसेच मिऱ्या–नागपूर महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याचे वारंवार दिसून येते. ओव्हरलोड वाहनांकडे आरटीओ विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचा संताप वाहनचालक व स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3199170
Share This Article