GRAMIN SEARCH BANNER

श्रद्धेचा आगळावेगळा आविष्कार; मुंबई ते वांझोळे २२ तासांचा सायकल प्रवास करून अजित गवळींनी फेडला नवस

Gramin Varta
116 Views

देवरुख: कोकणातील पारंपारिक आणि मोठ्या शिमगोत्सवाचे आकर्षण सातासमुद्रापार असलेल्या चाकरमान्यांनाही असते. याच उत्सवाच्या निमित्ताने देवरुखजवळील वांझोळे येथील अजित गवळी यांनी आपल्या ग्रामदेवतेप्रती असलेली अढळ श्रद्धा एका अनोख्या उपक्रमातून सिद्ध केली आहे. मुंबई ते वांझोळे असा सलग २२ तासांचा सायकल प्रवास करून त्यांनी आपली ग्रामदेवता जुगाईदेवीला केलेला नवस पूर्ण केला असून, त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अजित गवळी हे मुंबईतील बोरीवली येथील टाटा पॉवरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मुंबईहून आपला सायकल प्रवास सुरू केला. रणरणते ऊन आणि रात्रीच्या प्रवासाचे आव्हान पेलत, तब्बल २२ तासांच्या सातत्यपूर्ण प्रवासानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता आपल्या मूळ गावी वांझोळे बावनदी येथे सुखरूप पोहोचले. विशेष म्हणजे, अजित गवळी यांनी सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारे सायकलने प्रवास करून आपला नवस फेडला आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्येही त्यांनी अशाच जिद्दीने सायकल सफर पूर्ण केली होती.

पर्यावरणपूरक संदेश देत आणि श्रद्धेचा नवा आदर्श घालून देणाऱ्या या प्रवासाचे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सन २०२४ मध्ये जुगाई-केदारलिंग नवतरुण मित्र मंडळ आणि वांझोळे खुर्द बावनदी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जुगाई मंदिरात विशेष सत्कार करण्यात आला होता. तसेच देवरुख हायस्कूलच्या १९८५-९० च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कौटुंबिक पाठबळ आणि वडिलाधाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे हा कठीण प्रवास सुकर झाल्याचे गवळी यांनी सांगितले. श्रद्धेसोबतच आरोग्याचा आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या सायकल सफरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

3181348
Share This Article