सचिन यादव / संगमेश्वर
दिवाळीच्या आनंदोत्सवानंतर येणारा भाऊबीज सण संगमेश्वर तालुक्यात प्रेमळ आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. भावाबहिणींच्या अतूट नात्याचे आणि स्नेहबंधनाचे प्रतीक असलेला हा सण असल्याने सकाळपासूनच ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
घराघरांत पारंपरिक पद्धतीने ओवाळणीचे विधी पार पडले. बहिणींनी तिळगुळ देत भावांना दीर्घायुष्याचे आशीर्वाद दिले, तर भावांनीही बहिणींना प्रेमाने भेटवस्तू देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. काहींनी सरप्राईज गिफ्ट्स, कपडे, मिठाई, तर काहींनी सोन्याचे दागिने देऊन आपुलकी व्यक्त केली.
सणानिमित्त घरांमध्ये रांगोळ्या, फुलांची सजावट आणि दिव्यांच्या प्रकाशाने वातावरण उजळून निघाले होते. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन जेवणावळींचा आणि कौटुंबिक भेटीगाठींचा आनंद घेतला. काही बहिणींनी भावासाठी खास पदार्थ बनवून प्रेमाची गोडी वाढवली.
संपूर्ण तालुका आनंद, स्नेह आणि कौटुंबिक एकतेच्या रंगात रंगून गेला होता.
भाऊबीज सण उत्साहात साजरा; प्रेम, स्नेह आणि आनंदाचा जल्लोष







