GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: मिऱ्यात रांगोळीच्या वादातून मच्छिमारावर बोटीवरच प्राणघातक हल्ला; नऊ वार केल्याने खळबळ

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी व्यक्तीचे नाव असून, त्यांच्यावर मच्छिमार बोटीवरच धारदार शस्त्राने तब्बल नऊ वार करण्यात आले आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण मिऱ्या परिसरात मोठी खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी जयेंद्र नार्वेकर हे आपल्या मच्छिमार बोटीवर नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक काही व्यक्तींनी बोटीवर येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर सपासप वार करण्यात आले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे काही दिवसांपूर्वी भाटीमिऱ्या परिसरात शिमगोत्सवा दरम्यान झालेला रांगोळीचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. श्री नवलाई पावणाईच्या पालखी स्वागतासाठी रांगोळी काढत असताना झालेल्या धक्काबुकीचे रूपांतर त्यावेळी मोठ्या राड्यात झाले होते. त्या प्रसंगामध्ये सुमारे १०० ते १५० लोकांचा जमाव समोरासमोर आला होता आणि त्यात जयेंद्र नार्वेकर यांचाही समावेश होता. मध्यस्थांनी तो वाद मिटवला असला, तरी त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी आज हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.हा हल्ला नेमका कोणी केला आणि यामध्ये एकूण किती जणांचा सहभाग आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. मिऱ्या परिसरात या घटनेमुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3471954
Share This Article