GRAMIN SEARCH BANNER

देवरुखच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांचा मदतीचा ओघ कायम राहणार; नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट

Gramin Varta
11 Views

देवरुख: देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान विजयानंतर, शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडत नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी स्थानिक आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या वेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचे सविस्तर निवेदन आमदार निकम यांना सादर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नगरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, शहराचे सौंदर्यीकरण आणि मूलभूत विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

आमदार शेखर निकम यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला. देवरुखच्या विकासासाठी महायुती सरकारकडून विशेष निधी मिळवण्यासाठी आपण स्वतः आग्रही असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ठोक तरतूद आणि नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहरात भरीव कामे केली जातील, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून देवरुखच्या प्रलंबित प्रश्नांची तड लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेवक यशवंत गोपाळ, दिपक खेडेकर, संदीप वेळवणकर, सिद्धेश वेल्हाळ, अनुराग कोचिरकर, अक्षय झेपले, तसेच नगरसेविका रुपाली बेंद्रे, श्रद्धा इंदूलकर, कविता नार्वेकर, रितीका कदम, मनस्वी आंबेकर उपस्थित होते. याशिवाय अभिजीत शेट्ये, प्रफुल्ल भुवड, रविंद्र लाड, रविंद्र आंबेकर यांसह अन्य मान्यवरही या वेळी उपस्थित होते. आमदार आणि नगरपंचायत पदाधिकारी यांच्यातील या सकारात्मक चर्चेमुळे देवरुखच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article