सांगली : शहरात मुस्लिम कार्यकर्त्याकडून गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या वर्षीही 25 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली असून, आता आगामी अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये गणेशनगर आणि मुख्य बसस्थानक रोडवरील अष्टविनायक गणेश मंडळाचा समावेश आहे.
येथील सांगलीतील गणेशनगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ यांच्यावतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. ही परंपरा सलग 25 वर्षांपासून सुरु असून, यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आली. यावेळी उत्तम मोहिते, मंडळाच्या संस्थापिका अॅड. मेरी मोहिते, मंडळाचे अध्यक्ष टीपू पटवेकर, इम्रान मुल्ला, सनाउल्ला बावचकर, युनूस कोल्हापुरे, जावेद मदारी, हमीद मदारी, मोहम्मद मदारी, नजीम मदारी, अकबर मदारी, अली नदाफ आदी उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे साजरा होणार असून, आरती, पूजा, पाठ यांचे आयोजन मुस्लिम बांधव करणार आहेत. येथील मुख्य बसस्थानक रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते युनूस महात यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी या मंडळाकडून ‘शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका’ हा ऐतिहासिक देखावा उभारण्यात आला आहे. यामध्ये 65 मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
हिंदू-मुस्लिम कार्यकर्त्याकडून 25 वर्षापासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आगामी अकरा दिवस गणेशोत्सवाच्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे यावर्षी संजय तेली हे अध्यक्ष असून, जावेद मुजावर, फिरोज शेख, विनोद ताळे, अनंत भोसले आदींसह कार्यकर्ते गणेशोत्सव सोहळ्याचे संयोजन करीत आहेत.
सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेशाची प्रतिष्ठापना
