नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागातून आषाढी वारी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुमाता सौ. सुप्रियाताई, मुख्याध्यापिका डॉ. अबोली पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीची सुरुवात मुख्य मंदिराच्या दिशेने करण्यात आली.
या वेळी बालचिमुकले विठ्ठल-रुखुमाई तसेच महाराष्ट्रातील संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी मंदिरात पोहोचली, जिथे तिचे साग्रसंगीत स्वागत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पालखी आत नेऊन पूजन करण्यात आले.प्रशालेतर्फे हा दिंडी सोहळा दरवर्षी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा वारसा आणि संतपरंपरेचे मोल कृतीतून शिकवण्यासाठी आयोजित केला जातो.
विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात रिंगण, फुगडी, करवत कणा, अभंग गायन यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले.विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले संत गोरा कुंभार यांचे नाट्यप्रयोग. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या नाटुकलीतून “भगवंताचे नामस्मरण जितक्या एकाग्रतेने केले जाते, तितकाच तो पाठीराखा असतो,” हा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
देवयोगी यांनी कौरव, पांडव व यादव कुळातील श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित एक रंजक कथा सादर केली, जी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेली.कार्यक्रमादरम्यान अभंग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देण्यात आल्या.
गुरुमाता सौ. सुप्रियाताई यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना सांगितले, “कृतीतून शिकण्यासारखे खूप काही असते,” आणि त्यांनी संत गोरा कुंभारांच्या उदाहरणातून उपस्थितांना प्रेरणा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. यशश्री पाटील आणि कु. काव्य विंचू यांनी अत्यंत सुंदररीत्या पार पाडले. अखेरीस आरती आणि पसायदानाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्ये आषाढी वारी दिंडी सोहळा उत्साहात

Leave a Comment