रत्नागिरी : चिपळूणमध्ये कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र बँकेतून जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ५२ वर्षीय महिलेकडून ५०,००० रुपये उकळले. फसवणूक झालेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
फसवणूक झालेली महिला, रोहिणी रुपेश चव्हाण (वय ५२, भोम मधलीवाडी, चिपळूण) येथील रहिवासी आहेत. त्या आयुर्वेदिक उत्पादने विकण्याचा व्यवसाय करतात. १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. एका अज्ञात आरोपी महिलेने चव्हाण यांच्याशी संपर्क साधून, त्यांना महाराष्ट्र बँकेमधून जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत आठ दिवसांत कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून १० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून ५०,००० रुपये घेतले.
पैसे घेऊनही आरोपीने चव्हाण यांना कोणतेही कर्ज मिळवून दिले नाही आणि रक्कमही परत केली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:४५ वाजता चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०५ वाजता आरोपी महिलेला अटक केली.
चिळूणमध्ये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 50 हजारांची फसवणूक; एक महिला अटकेत
