रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश्य परिस्थितीचा मोठा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या या हवामानामुळे गणपतीपुळ्याचा समुद्र प्रचंड खवळला असून, उसळणाऱ्या उंच लाटांनी किनाऱ्यावरील जनजीवन विस्कळीत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने दिलेल्या वादळाच्या इशाऱ्यामुळे या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सावधगिरीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील समुद्राने आज अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकत असल्याने समुद्र खवळल्याचे स्पष्ट दिसून आले.
समुद्राची ही धोकादायक स्थिती पाहता, किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने किनाऱ्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तास हवामानाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






