नातेवाईकाला अखेरचा निरोप देऊन परतताना काळाचा घाला; विहिरीत कार कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Gramin Varta
283 Views

जालना : नातेवाईकाच्या दफनविधीसाठी गेलेल्या कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. पारध-वालसावंगी मार्गावर पद्मावती गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्यालगतच्या सुरक्षा कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर कारमधील दोन पुरुषांना ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

धावडा येथील रहिवासी सुलताना बेगम जियाउल्लाखान (वय 47), अकतरबी (वय 75), अबुताला जियाउल्लाखान (वय 22) आणि अल्तामश खान हे चौघे सावंगी अवघडराव येथे नातेवाईकाच्या दफनविधीसाठी गेले होते. दफनविधी आटोपल्यानंतर चौघेही कारने धावडा गावाकडे परतत होते. मात्र, पारध-वालसावंगी मार्गावर पद्मावती गावाजवळ कार अनियंत्रित झाली आणि क्षणातच रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली.

कार विहिरीत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले आणि कारमधील अबुताला जियाउल्लाखान व अल्तामश खान या दोन्ही पुरुषांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत सुलताना बेगम जियाउल्लाखान यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत असलेल्या अकतरबी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेमुळे धावडा परिसरावर शोककळा पसरली आहे. एका नातेवाईकाच्या दफनविधीत सहभागी होऊन परतीच्या वाटेवर असलेल्या कुटुंबावरच मृत्यूने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी कार विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र अंधारामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर आज कार विहिरीबाहेर काढण्यात आली.

Total Visitors :
4667322
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *