GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत जागेच्या वादातून वृद्धाला जिवे मारण्याची धमकी; आरोपीने स्वतःवरच सुऱ्याने वार करून निर्माण केला थरार

Gramin Varta
58 Views

दापोली : तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून एका ७६ वर्षीय वृद्धाला जिवे मारण्याची धमकी देऊन स्वतःवरच सुऱ्याने वार करून घेणाऱ्या एका इसमाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान केल्याचा ठपकाही आरोपीवर ठेवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर भिकाजी यादव हे आपल्या जुन्या घराची दुरुस्ती करत असताना आरोपी महेंद्र सिताराम पवार याने त्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश केला. फिर्यादी यांनी आरोपीला घुसखोरी न करण्याबाबत आणि तेथून निघून जाण्याबाबत सांगितले असता, आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

काही वेळानंतर आरोपी हातात सुरा घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आला आणि फिर्यादीकडे पैशांची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास मी स्वतःला सुरा मारून घेईन आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करीन अशी धमकी देऊन आरोपीने हातातील सुरा हवेत निष्काळजीपणे फिरवून स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले. या जीवघेण्या कृत्यामुळे फिर्यादीच्या जीविताला धोका निर्माण झाला असून आरोपीने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.

याप्रकरणी मनोहर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी महेंद्र पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ (अ), ३२९(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ नुसार नोंद केला आहे. स्वतःला जखमी करून दुसऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून जागेत घुसखोरी केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3366220
Share This Article