रत्नागिरी पोलिसांची जलद आणि कौतुकास्पद कारवाई
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिसांनी एका अश्लील शिवीगाळ प्रकरणात अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करून आणि केवळ २३ दिवसांत आरोपीला शिक्षा सुनावण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पीडित महिलेला तात्काळ न्याय मिळाला असून, संपूर्ण जिल्ह्यातून रत्नागिरी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सदर घटना १९ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुळेकरवाडी, सावर्डे येथे घडली. फिर्यादी महिला आपल्या घराच्या अंगणात कचरा साफ करत असताना, त्याच गावातील रहिवासी सचिन मारुती गुळेकर (वय ३५) हा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या समोर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. यामुळे महिलेला मानसिक त्रास झाला आणि त्यांनी तत्काळ सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून, १९ जून रोजीच दुपारी १.३५ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पी.एल. चव्हाण आणि महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. मेश्राम यांनी जलदगतीने पूर्ण करून केवळ २४ तासांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर घेण्याची मागणी पोलिसांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत साक्षीदारांचे वेळेवर परीक्षण केले. न्यायालयात सबळ पुरावे सादर झाल्यानंतर, मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १ केदार पोवार (चिपळूण) यांनी आरोपी सचिन गुळेकर याला दोषी ठरवत तीन वेगवेगळ्या कलमांत प्रत्येकी १ महिन्याच्या साध्या कारावासाची आणि प्रत्येकी १००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसांच्या अतिरिक्त कैदेची तरतूद ठेवण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून श्रीमती तृष्णा तळेकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, पोउपनिरीक्षक चव्हाण, पोहेकॉ बी.एस. कोळेकर, मपोहेकॉ आर.पी. मेश्राम, पोहेकॉ एम.एम. कांबळे यांनी या गुन्ह्याच्या तपासात मोलाची भूमिका बजावली.
चिपळूण : अवघ्या २३ दिवसांत आरोपीला शिक्षा; अंगणात कचरा काढताना महिलेला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला कारावास
