संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री परिसर विद्या विकास संस्थेच्या नवजीवन विद्यालय, फुणगूस येथे २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार घेतलेल्या या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
२ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान कार्यानुभव उपक्रमांतर्गत राख्या बनवणे, तिरंगा विषयक चित्रकला, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसेच सेल्फी विथ तिरंगा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी शाळेत सामुदायिक पसायदान गायनाने देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
१५ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर संस्था उपाध्यक्ष सन्माननीय डॉ. अरुण डिंगणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमास पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संचलनासह देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले व संगीताच्या तालावर कवायत सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिक्षा चालक-मालक संघटना व ग्रामस्थ श्री. संदेश बेर्डे, श्री. आबा भोसले, श्री. प्रमोद शिंदे, श्री. प्रकाश भोसले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. तर श्री. मुज्जमिल मुजावर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोटभर पोहे दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रणदिवे सर यांनी केले. शाळेचे विविध उपक्रम पाहून संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री. चंदुभाई देशपांडे, सचिव सन्माननीय श्री. दिलीपभाई कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी कौतुक व्यक्त केले.
शेवटी मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी कार्यक्रमाची अधिकृत सांगता करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य विद्यार्थ्यांनी आनंदात साजरे केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नवजीवन विद्यालय फुणगूस येथे विविध उपक्रमांची उत्साहात सांगता
