GRAMIN SEARCH BANNER

तरुणाचा साखरपा ते नेपाळ ५४०० किमीचा आंतरराष्ट्रीय बाईक प्रवास पूर्ण

Gramin Varta
340 Views

व्यवसाय सांभाळत विवेक गुरुपादगोळ यांनी जोपासला रायडिंगचा छंद

🖋️ भरत माने / साखरपा
कोंडगाव (साखरपा) येथील हरहुन्नरी तरुण विवेक (विकी) गुरूपादगोळ याने साखरपा ते नेपाळ असा तब्बल ५४०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय बाईक रायडींग प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. व्यवसाय सांभाळत बाईक रायडींगचा छंद जोपासणाऱ्या विवेकच्या या धाडसी कामगिरीचे साखरपा परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

साखरप्याच्या बाजारपेठेत किराणा दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या विवेकने १२ डिसेंबर रोजी या प्रवासाला सुरुवात केली. साखरपा – मुंबई – इंदोर – कानपूर – नेपाळ – बुटवाल असा प्रवास करत त्याने सुमारे दहा दिवसांत हा टप्पा पूर्ण केला. २४ डिसेंबर रोजी तो पुन्हा साखरप्यात परतला. दररोज सकाळी ५ ते सायंकाळी ७ या कालावधीत सुमारे ६५० ते ७०० किलोमीटरचे अंतर त्याने पार केले. त्यामुळे हा प्रवास किती कठीण आणि जिकिरीचा होता, याची कल्पना येते.

या संपूर्ण प्रवासात त्याची ‘हिमालयन’ बाईक उत्तम साथ देत असल्याचे विवेकने सांगितले. तसेच कोल्हापूर येथील जयदीप नाळे हा त्याचा सहकारी या प्रवासात सोबत होता. त्याच्या सहकार्यामुळे प्रवास अधिक सुखकर झाल्याचेही विवेकने नमूद केले.

याआधीही विवेक गुरूपादगोळ याने अनेक दीर्घ पल्ल्याचे बाईक रायडींग ट्रेक पूर्ण केले आहेत. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लेह-लडाख, कन्याकुमारी असा सुमारे ७ हजार किलोमीटरचा प्रवास त्याने यशस्वीरीत्या केला आहे. “आपण काहीतरी वेगळे साहस करावे आणि बाईक चालवण्याच्या छंदातून नवी ऊर्जा मिळवावी, या प्रेरणेतून दरवर्षी एकदा व्यवसाय सांभाळून असे दौरे करतो,” असे त्याने सांगितले.

या यशामागे कुटुंबियांची भक्कम साथ आणि देवाचा आशीर्वाद असल्याचे तो आवर्जून सांगतो. भविष्यात हिमाचल प्रदेशातील अत्यंत कठीण मानला जाणारा ‘स्पीती’ ट्रेक करण्याचे स्वप्न असल्याचेही त्याने व्यक्त केले.

बाईक रायडींग करणाऱ्या नव्या तरुणांसाठी संदेश देताना विवेक म्हणाला की, ट्रेक करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, सेफ्टी किट व योग्य गियर वापरावा, वेगाची मर्यादा पाळावी आणि कोणतीही अतिशयोक्ती टाळावी. “तरुण वयात फिरा, अनुभव घ्या. या छंदातून केवळ आनंदच नाही तर जगण्याची नवी उमेद मिळते,” असे सांगत त्याने अनेकांना प्रेरणा दिली.

Total Visitor Counter

3366895
Share This Article