रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम वेगाने मार्गी लागले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या एकूण 55 हजार 293 विद्यार्थी संख्येच्या तुलनेत, 98 टक्के एवढ्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ही माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण लोहार यांनी दिली. 30 सप्टेंबर हा आधार कामासाठी शेवटचा दिवस ठरवून देण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीसाठी राज्य पातळीवर शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली होती. शिक्षक संख्या ठरवण्यासाठी संचमान्यता आता आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निश्चित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक शाळेने प्रलंबित विद्यार्थी आधार प्रकरणे निश्चित करून ती निकाली करावीत, अशा सूचना दिल्या होत्या. केंद्रनिहाय नियोजन करून प्रत्येक शाळेतील प्रलंबित विद्यार्थी संख्या शून्यावर यावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
आधार नोंदणी संचापैकी काही संच निकामी झाल्यास ते दुरुस्त करून कार्यरत व्हावेत म्हणून आवश्यक निधीचा जरूर वापर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण पूर्ण करावे अशा सूचना होत्या. मुख्याध्यापकांनी स्वतः खात्री करून प्रत्येक विद्यार्थी ‘सरल’ प्रणालीमध्ये योग्य स्वरूपात नोंदणीकृत झाला आहे, हे सुनिश्चित करावे, असे सांगण्यात आले होते. विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरण याविषयी कोणतीही सबब न सांगता ठरलेल्या वेळेत ते पूर्ण करावे, अशा सूचनांवर शिक्षण विभागाने जोर दिला होता. आधार कार्यवाहीनंतर अपात्र नोंदणी करून विद्यार्थ्यांची शिक्षण विभागातील कार्यवाही नोंद करण्याविषयी देखील सूचना देण्यात आल्या आहेत.





