GRAMIN SEARCH BANNER

नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून सहाय्य मिळविणे अधिक सुलभ

८ तासांत मिळणार रुग्णांना आर्थिक मदत

मुंबई: नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

यात रूग्णाऐवजी परस्पर रूग्णालयाकडून आर्थिक सहाय्यासाठी अर्ज सादर होणार असल्याने रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची ऑनलाईन प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया आठ तासांत पूर्ण होईल. विशेष म्हणजे रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळेल. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली.

वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये रुग्णकेंद्री बदल करण्याचे काम सुरु आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवेल. नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन आठ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळेल. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहेत. राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येईल, असे या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्षभरात ४०,७७६ रुग्णांना दिलासा

एप्रिल,२०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. या रूग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली.

Total Visitor Counter

3487660
Share This Article