GRAMIN SEARCH BANNER

खेड बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या पर्समधून १ लाख २० हजारांचे दागिने लंपास

Gramin Varta
111 Views

खेड: खेड बस स्थानकावर प्रवास करणाऱ्या एका ७४ वर्षीय वृद्ध महिलेला गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लक्ष केले आणि त्यांच्या पर्समधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असली तरी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे फिर्यादीने तब्बल दीड महिन्याहून अधिक काळानंतर २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रभावती सदानंद मोरे (वय ७४), मूळच्या बिरमणी, ता. खेड येथील रहिवासी असून, सध्या त्या मुंबईतील कुर्ला, नेहरू नगर येथे वास्तव्यास आहेत. दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी त्या चिपळूण येथे आपल्या लहान मुलाला, शेखर मोरे यांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. खेड बस स्थानकातून खेड-रत्नागिरी-चिपळूण मार्गे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये त्या चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती.

याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत लबाडीच्या इराद्याने प्रभावती मोरे यांच्या गळ्यात अडकवलेल्या पर्समधून हातचलाखी केली. चोरट्याने पर्समधील पाकीट बाहेर काढले आणि त्यातील १,२०,००० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ (११ ग्रॅम ३० मिली वजनाची, षटकोनी आकाराचे मणी असलेली) आणि रोख ५०० रुपये असे एकूण १,२०,५०० रुपयांचे मौल्यवान साहित्य चोरून नेले.
या घटनेनंतर फिर्यादी मोरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या मुंबईत उपचारासाठी गेल्या होत्या. उपचारांमुळे त्यांना तात्काळ तक्रार दाखल करता आली नाही. अखेर प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या चोरीप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३०३(२) अंतर्गत गु.र.क्र. ३२६/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करून होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे बस स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3205043
Share This Article