GRAMIN SEARCH BANNER

लांजातील प्रभाग २ च्या सर्वांगीण विकासासाठी मी खंबीरपणे काम करणार : पंढरीनाथ मायशेट्ये

Gramin Varta
140 Views

लांजा : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पंढरीनाथ मायशेट्ये यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, स्थानिक जनतेचा सकारात्मक कल हीच माझी सर्वात मोठी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘निवडून आल्यानंतर माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

निवडणूक प्रचाराला दिवसेंदिवस रंग चढत असताना मायशेट्ये यांनी आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आवश्यक नागरी सुविधांच्या तातडीच्या गरजा वेगाने पूर्ण करणे हे पहिले लक्ष्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘लांजा शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या तुलनेत प्रभागातील गरजाही विविध आणि वाढत्या स्वरूपाच्या झाल्या आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हीच आता सर्वात महत्त्वाची गरज आहे,’’ असे मायशेट्ये म्हणाले.

यावेळी त्यांनी प्रभागातील तरुणांकडून मिळणाऱ्या उत्साहपूर्ण प्रतिसादाचाही उल्लेख केला. तरुणांसाठी स्वतंत्र शैक्षणिक व मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. रोजगारक्षम शिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, करिअर काउन्सेलिंग तसेच कौशल्यवृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनेक नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे नमूद करत मायशेट्ये म्हणाले, ‘‘प्रभागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणे ही माझी मोठी जबाबदारी आहे. यासाठी विशेष शिबिरे, जनजागृती मोहीमा आणि घरपोच माहिती देण्याची व्यवस्था केली जाईल.’’

‘‘प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखाच आहे. त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि गरजा ओळखून त्यांचे समाधान करणे हेच माझे ध्येय आहे. विकासाची नवी दिशा देण्यासाठी मी मनापासून काम करेन,’’ असेही मायशेट्ये यांनी सांगितले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक २ मधील ही लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, मायशेट्ये यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभागातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळत आहे.

Total Visitor Counter

3388206
Share This Article