GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांविरोधात उच्च न्यायालयात धाव

Gramin Varta
344 Views

सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांची जनहित याचिका दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहर तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रिया आवले यांच्यामार्फत सादर करण्यात आली आहे.

या याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी तसेच नगर विकास मंत्रालय यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नसल्याचा ठपका याचिकेत ठेवण्यात आला आहे.

गुहागर–चिपळूण, संगमेश्वर –देवरुख–साखरपा, आकेरी–हनमंत घाट, खेड–खोपी यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
राजकीय नेते आणि सत्ताधारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव याचिकेत मांडण्यात आले आहे, अशी माहिती वरवडे येथील रहिवासी असलेल्या प्रथमेश गावणकर यांनी दिली.

चिपळूण येथील रहिवासी असलेल्या ॲड. श्रिया आवले यांनी चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांच्या परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करून त्याचा याचिकेत उल्लेख केला आहे. दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्याचे व कमरेचे दुखणे, वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ, धुळीमुळे होणारे वायू प्रदूषण तसेच अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा आणि चिपळूण शहरातील नागरिकांना या त्रासातून मुक्ती मिळाली, तर आपल्या वकिलीचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान वाटेल, अशी भावना ॲड. आवले यांनी व्यक्त केली. या जनहित याचिकेची प्राथमिक सुनावणी १२ जानेवारी रोजी न्यायमूर्ती राजेंद्र अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3375070
Share This Article