GRAMIN SEARCH BANNER

दहावी-बारावीच्या मार्कशीटवर आता विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR Code; बोर्डाचा बनावटगिरी रोखण्यासाठी ऐतिहासिक निर्णय


मुंबई:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला असून, आता विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही. नवीन निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आता एकाच वेळी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, शैक्षणिक कागदपत्रांमध्ये होणारी फसवणूक आणि बोगसगिरी रोखण्यासाठी बोर्डाने मार्कशीटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक विशिष्ट ‘क्यूआर कोड’ (QR Code) छापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती केवळ काही सेकंदात स्कॅन करून पडताळता येणार असून, बनावट मार्कशीट ओळखणे अधिक सोपे होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर आता लाखो विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका लगेच मिळायची, मात्र मूळ प्रमाणपत्रासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागत असे. बोर्डाच्या या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा कायमची संपणार आहे. नव्या स्वरूपातील या मार्कशीटवर आधारकार्डानुसार विद्यार्थ्याचे नाव आणि फोटो असेल, ज्यामुळे निकालाची सत्यता अधिक पारदर्शक होणार आहे. तसेच, क्यूआर कोडच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक तपशील डिजिटल स्वरूपात त्वरित उपलब्ध होईल, ज्याचा मोठा फायदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेत होणार आहे.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळ यंदा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर करण्याच्या तयारीत असून, मे महिन्याच्या सुरुवातीलाच निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही काळात समोर आलेली पेपरफुटीची प्रकरणे आणि बोगस मार्कशीट रॅकेटच्या पार्श्वभूमीवर, बोर्डाने सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या आधुनिक बदलामुळे निकालाच्या प्रक्रियेत अधिक गतिमानता आणि विश्वासार्हता येणार असून, ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळेल. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे पालक आणि विद्यार्थी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3483439
Share This Article