रत्नागिरीहून मच्छी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चांडवे येथे स्विफ्टची जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
481 Views

मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर चांडवे गावच्या हद्दीत रविवारी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. रत्नागिरीहून मच्छी घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला मागून आलेल्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून मच्छी वाहतूक करणारा कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. याचवेळी मागून आलेल्या स्विफ्ट कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत स्विफ्ट कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. कारचालक श्रीपत भीमराव शिंदे (४२, रा. शिंदे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील संतोष मुरलीधर नागरे (३४, रा. नाशिक) आणि रवींद्र भाऊराव शिंदे (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त स्विफ्ट कारमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची विनापरवाना दारू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान अशी दारू आढळून आली नसल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची अधिकृत माहिती पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या अपघाताची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. आर. रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोटे पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :
4825674
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *