रत्नागिरी : तालुक्यातील वेताशी धनगरवाडी परिसरात शनिवारी दुपारी अचानक उसळलेल्या वणव्याने आंबा उत्पादकांचे कंबरडे मोडले. गवताला लागलेली आग काही क्षणांतच आंबा बागांमध्ये शिरली आणि अवघ्या काही वेळात पाच बागा जळून खाक झाल्या. आगीच्या या तडाख्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीची सुरुवात एका आंबा बागेतील पंपहाऊसजवळ झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दुपारच्या उष्णतेमुळे आणि कोरड्या गवतामुळे वाऱ्याच्या झोतासोबत आगीने झपाट्याने फैलाव घेतला. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वणव्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की काहीच वेळात आग नियंत्रणाबाहेर गेली.
या आगीत पाच आंबा बागांमधील झाडे, फळधारणा झालेली झाडे, सिंचनाची साधने आणि पंपहाऊस पूर्णतः जळून नष्ट झाले. अनेक वर्षांच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरल्याने बागायतदार अक्षरशः हतबल झाले आहेत. या बागांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर संबंधित कुटुंबांची उपजीविका अवलंबून होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाकडून नुकसान पंचनामा सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या वणव्यामुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.
रत्नागिरी : वेताशी धनगरवाडीत वणव्याने पाच आंबा बागा जळून खाक; लाखोंचे नुकसान






