मंडणगड: जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून मंडणगड तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसामुळे आतापर्यंत ९ घरे, ५ गोठे, सार्वजनिक वास्तू आणि पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ७ लाख २५ हजार ६४० रुपयांची हानी झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून प्राप्त झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या तपशिलानुसार, वडवली येथील पार्वती गावणूक यांचे २४ हजार, तर माहू येथील नंदकुमार रेडीज यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चिंचघर येथील अनिता काणेकर यांच्या घराचे १ लाख ३५ हजार आणि दहागाव येथील कल्पेश गांधी यांचे १ लाख ६५ हजार ६०० रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. कुडुकखुर्द येथील भिकू चव्हाण यांचे ३० हजार, तर दहागाव येथील हुसैन जोगिलकर यांच्या गोठ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. लाटवण येथील सुनील सकपाळ यांचे ९ हजार १२५ रुपये, पिंपळोली येथील सहदेव गायकवाड यांचे १२ हजार ४०० रुपये आणि भोळवली येथील कल्पना गोपाळ यांचे ९ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पिंपळोली येथील अरुण विचार यांच्या गोठ्याचे अंशतः नुकसान होऊन घराची पडझड झाल्याने ५७ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. चिंचघर येथील संतोष पिंपळकर यांच्या घराचे अंशतः नुकसान होऊन ९ हजार रुपयांची हानी झाली आहे.
याशिवाय, भोळवली येथील विठ्ठल कोकळे यांचे ६ हजार, सुजाता कोकळे यांचे ८ हजार ७५० आणि कादवण येथील सुभाष पवार यांचे ४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक इमारतींनाही पावसाचा फटका बसला असून, आंबवणेखुर्द येथील अंगणवाडीचे पावसात नुकसान झाल्याने १ लाख ५० हजार रुपयांची हानी झाली आहे. केळवत येथील सागर भोगल यांच्या पोल्ट्रीची पडझड झाल्याने ७९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मंडणगड हायस्कूलच्या इमारतीची पडझड झाल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडणगड बाजारपेठेत योगेश खापरे यांच्या दुकानाची पडझड झाल्याने तब्बल ३ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत केंगवळ येथील राजेश शिगवण यांचा एक बैल वाहून गेल्याने त्यांना ३५ हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
पावसामुळे मंडणगड तालुक्यातील शाळांसह शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे आणि पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शासनाकडून तातडीने योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.