संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांचे जिल्हा परिषद सीईओना पत्र
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि गणिती कौशल्ये सुधारण्यासाठी कृष्णा मेस्त्री या शिक्षकानी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन तो जिल्हाभरातील सर्व मराठी शाळांमध्ये लागू करण्याची मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्ह्याचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
सुहास खंडागळे यांनी आपल्या निवेदनात कृष्णा मेस्त्री यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. मेस्त्री गुरूजी हे गेल्या अनेक वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमाबाहेर जाऊन मुलांसाठी स्वतंत्र इंग्रजी वाचन आणि गणिती क्रिया उपक्रम राबवत आहेत. श्री. खंडागळे यांनी स्वतः मेस्त्री गुरुजी कार्यरत असलेल्या मेढे येथील शाळेला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाची पाहणी केली होती. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी वाचताना पाहून त्यांना विशेष समाधान वाटले.
या उपक्रमामुळे मुलांना इंग्रजी वाचन आणि गणिती ज्ञान सहजतेने आत्मसात करता येते. मेस्त्री गुरुजी यांनी वायंगणे आणि किरडुवे येथील शाळांमध्येही हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. सध्या ते देवरुख येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळेत कार्यरत असून, त्यांच्या वर्गातील मुलींचे इंग्रजी वाचन पाहून मराठी शाळांचे भविष्य अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्येच असल्याचे मत. सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले.
सुहास खंडागळे यांनी जिल्हा परिषदेने असे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. तसेच, शाळा व्यवस्थापन समित्यांनी त्यांच्या शाळेत राबवले जाणारे यशस्वी उपक्रम शिक्षण विभागाकडे सादर करावेत, जेणेकरून ते इतर शाळांमध्येही सुरू करता येतील. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढल्यास एकंदरीत सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.
मेस्त्री गुरुजींनी इंग्रजी वाचन आणि गणिती क्रियांसाठी स्वतः पहिली ते सातवीसाठी स्वतंत्र पुस्तके तयार केली आहेत, जी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ही पुस्तके अभ्यासक्रमावर आधारित असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक स्पष्टपणे समजावून सांगतात. यामुळे इंग्रजी वाचनास कंटाळा करणारी लहान मुलेही आवडीने आणि आत्मविश्वासाने कोणत्याही इयत्तेचे पुस्तक सहज वाचताना दिसतात आणि त्यांचे उच्चारही स्पष्ट असतात.
गाव विकास समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः मेस्त्री गुरुजींचा इंग्रजी वाचन आणि गणिती क्रिया उपक्रम शाळेत प्रत्यक्ष जाऊन पाहावा. ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती सुहास खंडागळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे.
रत्नागिरीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी आणि गणिताच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘मेस्त्री गुरुजी पॅटर्न’ लागू करण्याची गाव विकास समितीची मागणी
