रत्नागिरी: सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. आंबा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निवळे आणि गोठणे नियतक्षेत्रात लावण्यात आलेल्या भीषण वणव्याप्रकरणी वन विभागाने ही कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपीला यापूर्वी एका गुन्ह्यात जामीन मिळाला होता, मात्र गोठणे नियतक्षेत्रातील वणव्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याने आंबा वनपरिक्षेत्राच्या पथकाने त्याला पुन्हा ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
वनसंपत्तीचे नुकसान करण्यासोबतच शासकीय मालमत्तेची चोरी केल्याचा गंभीर आरोप आरोपीवर असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती आंबा वनक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. वणवा लावण्यामागचा नेमका हेतू काय होता आणि या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध आता वनकोठडी दरम्यान घेतला जाणार आहे. व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही आणि कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वन प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत वनपाल आणि वनरक्षकांचे पथक सक्रिय सहभागी असून पुढील तपास वनक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर करत आहेत.






