GRAMIN SEARCH BANNER

हर्णे समुद्रात मध्यरात्री थरार! कस्टम विभागाकडून डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; ३०० टन डिझेलसह दोन बोटी जप्त

Gramin Varta
139 Views

रत्नागिरी:  हर्णे किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तस्करीचे डिझेल विकणारी ‘रत्न माऊली’ ही बोट आणि डिझेल खरेदी करणारी दुसरी एक बोट अशा एकूण दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हर्णे किनारपट्टीवर एक मासेमारी बोट इतर बोटींना तस्करीचे डिझेल अवैधपणे विकत असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत अधीक्षक (P&I) अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिल २०२६ च्या रात्री समुद्रात विशेष शोधमोहीम राबवली. हर्णे किनारपट्टीपासून सुमारे ११ नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्न माऊली’ ही संशयास्पद बोट पथकाला दिसून आली. २१ आणि २२ एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री ही बोट डिझेलची विक्री करत असतानाच पथकाने तिला रंगेहात पकडले.
पकडण्यात आलेल्या दोन्ही बोटी तत्काळ दाभोळ जेटीवर आणण्यात आल्या असून, बोटीच्या कप्प्यांमध्ये साठवलेले सर्व अवैध डिझेल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, गेल्या दोन महिन्यांत ‘रत्न माऊली’ या बोटीने विविध फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी करून विक्री केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत आणि यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास सध्या सीमाशुल्क विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील श्री. शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. दापोलीच्या माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी हा अर्ज मंजूर करत दोन्ही आरोपींना कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी जनतेला आवाहन केले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही तस्करीच्या घटना निदर्शनास आल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे. नागरिक ८७९६८९५९९० किंवा ८४२११८४७५० या क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती देऊ शकतात, असे जनसंपर्क अधिकारी लक्ष्मीकांत भाटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

Total Visitor Counter

3319875
Share This Article