GRAMIN SEARCH BANNER

होर्मुजची सामुद्रधुनी ४८ दिवसांनंतर खुली

इराणकडून व्यापारी जहाजांना प्रवासाची परवानगी जाहीर

तेहरान: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि सलग ४८ दिवसांच्या अनिश्चिततेनंतर अखेर होर्मुज सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय समोर आला आहे.

इराणने घोषणा केली आहे की या रणनीतिक सागरी मार्गातून आता व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे खुली राहील आणि त्यांना ये-जा करण्याची संपूर्ण मुभा देण्यात आली आहे. हा निर्णय लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर घेण्यात आला आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, लेबनॉनमधील युद्धविराम करारानुसार होर्मुज सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीस पूर्णपणे परवानगी देण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या मते, हा निर्णय युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी लागू राहील आणि यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या समन्वित मार्गानुसार सर्व व्यापारी जहाजांना मार्गक्रमणाची परवानगी असेल. हा मार्ग इराणच्या पोर्ट्स अँड मेरीटाइम ऑर्गनायझेशनने निश्चित केला आहे.

यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या निर्णयावर प्रतिक्रिया देताना लिहिले की, “इराणने नुकतीच घोषणा केली आहे की इराणची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली आहे आणि वाहतुकीसाठी सज्ज आहे. धन्यवाद!”

होर्मुज सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारमार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गाने जातो. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठ आणि शिपिंग उद्योगासाठी दिलासादायक मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी आणि व्यापारातील स्थैर्य राखण्यासाठी सकारात्मक संकेत आहे.

अमेरिकी सैन्याने सांगितले की, इराणच्या बंदरांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी १३ जहाजे परत पाठवण्यात आली. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, सोमवारी सुरू झालेल्या नाकेबंदीनंतर आतापर्यंत एकही जहाज हा मार्ग पार करू शकलेले नाही.

Total Visitor Counter

3485590
Share This Article