GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : कळंबस्ते येथे अज्ञाताने बागेला लावली आग; चंदनाची शेकडो झाडे जळून खाक

Gramin Varta
153 Views

संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 
संगमेश्वर : तालुक्यातील कळंबस्ते भिमनगर येथे एका शेतकऱ्याच्या मेहनतीवर अज्ञाताने पाणी फेरले असून, बागेला लावलेल्या आगीत चंदनासह शेकडो फळझाडे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संकेत सिद्धार्थ मोहिते (वय ३९, सध्या रा. शिवडी, मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. २९ मार्च २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, ३१ मार्च रोजी या संदर्भात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत मोहिते यांची कळंबस्ते भिमनगर येथील सामूहिक जागेतील सर्व्हे नं. २०/१९ व २०/२१ मध्ये मोठी बाग आहे. या बागेत त्यांनी अत्यंत परिश्रमाने रक्तचंदन आणि श्वेतचंदनाची १५० झाडे लावली होती. याशिवाय हापूससह विविध प्रकारची १४० आंब्याची झाडे आणि शेवगा, काळीमिरी, आवळा, फणस, काजू, पेरू, रातांबी, चिकू अशी साधारण ५० हून अधिक अन्य झाडे जोपासली होती. मात्र, कोणीतरी अज्ञात इसमाने या बागेला जाणीवपूर्वक आग लावून ही सर्व झाडे जाळून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या आगीत मौल्यवान चंदनाच्या झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कोणातरी व्यक्तीने आकसापोटी हे कृत्य केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात मेहनतीने वाढवलेली बाग अशा प्रकारे जळून खाक झाल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करून या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3239388
Share This Article