रत्नागिरी: मिऱ्या बंदर येथील योमन मरिन कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नामदेव गणपत बारगुडे (वय ५२, रा. साठरे, बांबर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव बारगुडे हे १० ऑगस्ट रोजी योमन मरिन कंपनीत कामावर गेले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना घरी नेले.
मात्र, रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि छातीत पुन्हा तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना पुन्हा खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात झाली असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.