रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. कागदी बैठका आणि चर्चांपुरते न थांबता त्यांनी थेट मैदानात उतरून कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवाजीनगर येथे मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान बाजार परिसरातील अस्वच्छता, रस्त्यावर पडलेला भाजीपाला कचरा, विस्कळीत पार्किंग व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था पाहून नगराध्यक्षा सुर्वे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आठवडा बाजार आटोपल्यानंतर सर्व कचरा रस्त्यावर न टाकता केवळ घंटागाडीतच टाकावा, तसेच विक्री संपल्यानंतर संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी विक्रेते व नगर परिषद प्रशासनाला दिले. रस्त्यावर अस्वच्छता अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीवेळी नगराध्यक्षांसोबत स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे, राजू कीर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, भाजपचे कार्यकर्ते उमेश कुलकर्णी व अविनाश कुलकर्णी उपस्थित होते. बाजार परिसरात भाजी विक्रीतून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्यावर फेकलेला आढळून आला. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि वाहन पार्किंगची पूर्णतः अव्यवस्था दिसून आली. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थितीही अत्यंत खराब असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले.
नगराध्यक्षा सुर्वे यांच्या या अचानक ‘सरप्राइज व्हिजिट’मुळे नगर परिषद प्रशासन आणि भाजी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर नगर परिषद प्रशासन आता ‘अॅक्शन मोड’मध्ये येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शहर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी सुकर करण्याचा निर्धार नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यानिमित्ताने ठळकपणे मांडला आहे.






