GRAMIN SEARCH BANNER

पाचल–दिवाळवाडी रस्ता पुन्हा खड्ड्यात; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
126 Views

पाचल/अंकुश पोटले: राजापूर तालुक्यातील पाचल ते दिवाळवाडी या मुख्य रस्त्याची अवस्था पुन्हा एकदा अत्यंत बिकट झाली असून, वारंवार केल्या जाणाऱ्या वरवरच्या दुरुस्तीमुळे नागरिक कमालीचे संतापले आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी खड्डे बुजविण्याचे आणि डांबरीकरणाचे सोपस्कार पार पाडले जातात, मात्र काहीच दिवसांत रस्ता पुन्हा पूर्ववत खड्ड्यात जात असल्याने ठेकेदारांकडून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पाचल पेठवाडीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दिवाळवाडी, बावकरवाडी, गुरववाडी, गोसावीवाडी आणि गोरुलेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता दैनंदिन जीवनाचा मुख्य आधार आहे. असे असूनही संबंधित खात्याकडून या महत्त्वाच्या मार्गाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने जनसामान्यांतून सवाल उपस्थित केले जात आहेत.

रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि खचलेल्या भागांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात साचणारे पाणी आणि चिखलामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच अत्यावश्यक दळणवळणासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाने आता केवळ मलमपट्टी न करता तात्काळ दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जर संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार स्वरूपात पूर्ण केले नाही, तर दिवाळवाडीसह परिसरातील सर्व वाड्यांमधील नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3379158
Share This Article