खेड (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. जयगडहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका एलपीजी गॅस कंटेनरने ब्रेक फेल झाल्यामुळे दोन कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारमधील प्रवाशांना दुखापत झाली असून, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, AP 31 TH 7652 क्रमांकाचा हा गॅस टँकर भोस्ते घाटातून जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी वाहनाचे इंजिन बंद पडून स्टेरिंग लॉक झाल्याने टँकर थेट समोरच्या वाहनांवर आदळला.
या धडकेत दोन कारना जबर फटका बसला. यामध्ये, गणपतीपुळे येथून रायगड दर्शनासाठी निघालेली MH 05 AX 7768 क्रमांकाची तवेरा कार आणि चिपळूणहून खेडच्या दिशेने जाणारी MH 05 AS 0057 क्रमांकाची वॅगनार कार यांचा समावेश होता. टँकरने या दोन्ही गाड्यांना चिरडले. त्यानंतर, कंटेनर दुभाजकावर चढून दुसऱ्या बाजूला पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्था नानिजधाम यांची 24 तास तत्पर असलेली रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सुदैवाने, टँकरमधून गॅस गळती झाली नाही, त्यामुळे मोठा धोका टळला. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.






