रत्नागिरी : बीएसएनएल (भारतीय दूरसंचार निगम लि.) कंपनीने जिल्ह्यात नव्या जोमाने काम सुरू केले आहे. खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना जिल्ह्यात 4- जी चे 188 नवीन टॉवर उभारण्यात येत आहे.
त्यापैकी 140 टॉवर सुरू झाले आहेत. भविष्यात ग्राहकांना सर्वांत स्वस्त आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बीएसएनएलचे नेटवर्क जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहचले पाहिजे हे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे बीएसएनएलच्या येथील महाप्रबंधक अमृता लेले यांनी सांगितले.
2 जी सेवेमध्ये असलेल्या बीएसएनएला नवसंजीवणी देण्यासाठी 4 जी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला पुन्हा चांगले दिवस येणार हे निश्चित आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी कंपनीने जिल्ह्यात बीएसएनएलचे 188 नवीन 4जी टॉवर मंजूर केले, त्यापैकी 140 टॉवर उभारण्यात आले आहेत. कंपनीचे जिल्ह्यातील एकूण टॉवर 362 झाले आहेत. त्यामुळे नेटवर्कमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा दावा बीएसएनएलच्यावतीने करण्यात आला आहे. उर्वरित टॉवर लवकरच उभारले जाणार आहे. पावसामुळे हे काम रेंगळले होते. त्यात टॉवरना शेवाळ धरल्याने कामांमध्ये अडथळा येत होता. परंतु आता नव्या जामाने काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सुमारे पावणे 3 लाख बीएसएनएलचे ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या नव्या सेवेमुळे दिवसाला सुमारे 80 ते 100 ग्राहक नव्याने मिळत आहेत.
ज्या ठिकाणी महावितरणची जोडणी नाही, तेथे सोलर आणि इंजिनद्वारे वीज पुरवठा केला जातो. नव्या टॉवरला 71 ठिकाणी महावितरणची जोडणी मिळाली आहे. बहुतांशी मोबाईल टॉवर सुरू झाले आहेत. जोडण्या वाढल्या असून तक्रारी देखील कमी झाल्या आहेत, असे लेले यांनी सांगितले. जिल्ह्यात अजून ही 1 हजार 600 लॅण्डलाईनधारक आहेत. जोवर सर्व कन्व्हर्ट होत नाहीत तोवर ही सेवा सुरू राहणार आहे. त्यांना कॉपर केबेलने सर्व्हिस दिली जात होती. परंतु आता फायबरने सर्व्हिस दिली जाणार असल्याने स्पिड वाढणार आहे, असे लेले यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात बीएसएनएलचे 188 नवीन टॉवर
