GRAMIN SEARCH BANNER

देवरूखात अवैध गुरांची वाहतूक पकडली, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
262 Views

संगमेश्वर : देवरूख शहरालगत मार्लेश्वर तिठा येथे बुधवारी सकाळी पोलिसांच्या स्थिर पथकाने अवैध गुरांची वाहतूक करणारी आयशर टेम्पो गाडी पकडली. या कारवाईत चार गुरांसह दहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्थिर पथकावर ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस माधुरी शिवाजी पिंगळे या वाहनांची तपासणी करत होत्या. यावेळी देवरूखहून कोल्हापूरकडे जाणारा एमएच ०८ क्यू ३८३८ हा आयशर टेम्पो थांबवून तपासण्यात आला असता वाहनात गुरे दिसून आली. वाहनचालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने तीन गुरांचा परवाना दाखवला; मात्र गाडीमध्ये प्रत्यक्षात चार गुरे असल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने महिला पोलीस पिंगळे यांनी तत्काळ देवरूख पोलिसांना कळवले.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, हेडकॉन्स्टेबल अभिषेक वेलवणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर चारही गुरे आणि आयशर टेम्पो जप्त करून देवरूख पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जप्त केलेली गुरे किरदाडी येथील गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

या प्रकरणी सैफान रमजान मुल्लाणी (वय २७, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी) आणि उदय दत्तात्रय मांगले (वय ४६, रा. साडवली, ता. संगमेश्वर) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला हेडकॉन्स्टेबल आर्या वेलवणकर करत आहेत.

Total Visitor Counter

3072969
Share This Article