रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरात चोरीची झाल्याची घटना उघडकीस आली असून, मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक अज्ञात व्यक्ती सीता देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरताना दिसत आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, मंदिर प्रशासनाकडून या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सध्या नवरात्रीचे दिवस असून, दिवसभर भक्तांची रीघ मंदिरात सुरू आहे. काल (२९ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेत असल्याचे भासवत गाभाऱ्यात कोणी नसल्याचा फायदा उठवत सीता देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दागिना चोरून पलायन केले.
दरम्यान, ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यात चोर दागिने चोरून पलायन करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाल्यास 9118884444 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.