GRAMIN SEARCH BANNER

लाडक्या बहिणींना आचारसंहितेपूर्वी दोन हप्ते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची १५ नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता

Gramin Varta
214 Views

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल १५ नोव्हेंबरपूर्वी वाजणार आहे. या दरम्यान आचारसंहितेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता देण्याचे नियोजन सुरू आहे.त्यावरील निर्णय याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. त्यासाठी राज्यभरातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आणि त्यांना १ जुलै २०२४ पासून लाभ देण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना दीड हजारांऐवजी २१०० रुपये देण्याचीही ग्वाही देण्यात आली. ही योजना महायुतीसाठी ‘गेम चेंजर’ ठरली. आता नोव्हेंबर ते जानेवारी या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या, २८९ नगरपालिका व २९ महापालिका आहेत.

पुढे फेब्रुवारीत १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडू शकते. दरम्यान, लाडक्या बहिणींना ई-केवायसीमुळे दिवाळीतही ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. आता आचारसंहिता लागणार असल्याने नोव्हेंबरचाही हप्ता न मिळाल्यास महिलांची नाराजी वाढू शकते. त्यामुळे लाभार्थींना दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रित दिला जाऊ शकतो, जेणेकरून योजनेतील महिला नाराज होणार नाहीत, हा त्यामागील हेतू असणार आहे.

ई-केवायसी’साठी मिळणार मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थींसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसीची मुदत आणखी काही दिवस वाढू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Total Visitor Counter

3199313
Share This Article