संतोष पवार / जाकादेवी
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे गावचे सुपुत्र आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचालित कर्मवीर हिरे महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. रामचंद्र यशवंत मेढेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. (शिक्षणशास्त्र – इंग्रजी अध्यापन) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
डॉ. मेढेकर यांनी “A Study of Effectiveness of Multimedia Program for English at Secondary Level” या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांनी हा अभ्यासक्रम शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल (जि. रायगड) येथील पीएच.डी. अभ्यास केंद्रात पूर्ण केला. त्यांना या संशोधन प्रक्रियेत प्राचार्या व माजी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सौ. रमा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, प्राचार्य डॉ. डी.एस. मो रूस्कर, प्राचार्य ए.डी. कुंभार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मा. सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन मधुकर आप्पा देसाई, संचालक प्राचार्य डॉ. पी.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदयकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.
डॉ. मेढेकर हे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी मराठा मंदिर संस्थेच्या जत (सांगली) व अ.के. देसाई विद्यालय, रत्नागिरी या शाळांमध्ये शिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली आहे.
विद्यार्थीदशेपासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा आणि मराठी माध्यमाच्या शिक्षणाची गुणवत्ता त्यांनी आपल्या यशातून अधोरेखित केली आहे. त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सुनिल उर्फ बंधू मयेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
कोळीसरे गावचे सुपुत्र डॉ. रामचंद्र मेढेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान
