GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना आता रेशनवर मिळणार रॉकेल; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय

Gramin Varta
209 Views

रत्नागिरी: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम आता थेट ग्रामीण भागातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागले असून, उद्भवलेल्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नवीन धोरणामुळे ग्रामीण भागात आगामी ४५ दिवस एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार नसल्याची चिन्हे आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील पात्र शिधापत्रिकाधारकांना केरोसीन म्हणजेच रॉकेलचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७ लाखांहून अधिक पात्र कुटुंबांना आता केवळ रेशन दुकानातच नव्हे, तर अधिकृत पेट्रोल पंपांवरही रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळावे लागले होते, परिणामी अनेक ठिकाणी चुली पेटू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी विधिमंडळात केरोसीन वितरणाबाबत महत्त्वाची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता जिल्ह्यात सुरू होत असून, जिल्हा पुरवठा विभागाने लाभार्थ्यांचा तपशील सादर करण्याची प्रक्रिया गतीने सुरू केली आहे.

गॅसच्या अनिश्चिततेमुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण होते, मात्र आता रॉकेल उपलब्ध होणार असल्याने ही चिंता काही अंशी दूर होणार आहे. इंधनाचा तुटवडा आणि जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. लवकरच पात्र कुटुंबांना त्यांच्या हक्काचे रॉकेल मिळण्यास सुरुवात होईल, असे संकेत पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3375782
Share This Article