GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथे दुचाकीची ‘इनोव्हा’ला मागून धडक; विरारमधील तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील माऊली नगर फाट्यासमोर एका भरधाव दुचाकीने कारला मागून जोरदार धडक दिल्याची घटना २ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथील आरोपी प्रथम श्रीधर पुजारी (वय २५, रा. म्हाडा बोळींज नाका, विरार पश्चिम) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक MH ४८ AJ ६८२५) घेऊन गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जात होता. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास माऊली नगर फाट्याच्या पुढे एकदंत हॉटेलसमोर तो आला असता, त्याने रस्त्यावरील वाहतुकीच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आपली दुचाकी अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगात चालवत त्याने समोरून मुंबईच्या दिशेनेच जाणाऱ्या इनोव्हा कारला (क्रमांक MH १२ TR ००९०) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कार आणि दुचाकी अशा दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची फिर्याद लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुयोग रोहीदास वाडकर (वय ३२) यांनी दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक प्रथम पुजारी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८/२०२६ अन्वये नोंद केला आहे. २ मार्च रोजी रात्री उशिरा ११.५२ वाजता या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3199554
Share This Article