राजापूर: राजापूर एस.टी. डेपो परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत भटकणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या वेळी गस्त घालत असताना पोलिसांना हा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळला.
ही घटना दिनांक २९/०९/२०२५ रोजी रात्री एस.टी. डेपो राजापूरजवळ घडली. राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संदिप रामचंद्र कुंभार (वय ४२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कमलेश भिखार शहा (वय ४३, रा. पाटोरे, हयाघाट, जिल्हा दरभंगा, राज्य बिहार) हा मध्यरात्रीच्या वेळी सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वीच्या वेळेत डेपो परिसरात संशयीत अवस्थेत फिरत होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले. चौकशी केली असता, तो चोरी करण्याच्या उद्देशाने या भागात भटकत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच दिवशी पहाटे ०१.०९ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कमलेश शहा याच्याविरोधात मु.र.नं. १८३/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ड) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या राजापूर पोलिसांनी वेळीच संशयित इसमाला ताब्यात घेतल्यामुळे परिसरात होणारा संभाव्य चोरीचा प्रकार टळला आहे.