दापोली: गव्हे पवारवाडीत घराचा दरवाजा फोडून सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास;
शेजाऱ्यावर संशय!

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

दापोली: दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भैरी देवीच्या यात्रेनिमित्त फिर्यादी कुटुंबियांसह घराबाहेर गेले असताना ही चोरी झाली असून, यामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या घरफोडीप्रकरणी फिर्यादीने आपल्या शेजाऱ्यावरच संशय व्यक्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (५१) हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. १० एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडले. त्यानंतर दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीच्या मदतीने उघडून त्यातील ऐवज चोरला. यामध्ये १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ज्यात पाच विविध प्रकारचे गंठण, हार आणि चपली हार यांचा समावेश आहे, असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

या घटनेला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा फिर्यादी पवार यांचे शेजारी राहणारे राजू शंकर चोगले यांच्या खिशात पवार यांच्या कपाटातील लॉकरमध्ये दागिने ठेवलेली ‘माताजी कलेक्शन’ची पिशवी मिळून आली. या पुराव्यावरून राजू शंकर चोगले आणि त्यांचा मुलगा राहुल राजू चोगले या दोघांनीच ही चोरी केली असावी, असा संशय अशोक पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि ओळखीच्याच व्यक्तींनी संशयास्पदरीत्या ही चोरी केल्याच्या चर्चेने गावात चिंतेचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *