चिपळूण बसस्थानकात महिलेची पर्स लंपास; पावणे आठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण:  चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. चिपळूण-तिवरे बसमध्ये चढत असताना भरदिवसा ही चोरी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काविळतळी येथील रहिवासी वैष्णवी विश्वनाथ शिंदे या शनिवारी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास तिवरे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढत असताना त्यांच्या खांद्याला असलेल्या चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये त्यांनी सोन्याचे दागिने असलेली एक हिरव्या रंगाची छोटी पर्स ठेवली होती. गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने अत्यंत चालाकीने ती छोटी पर्स चोरली. वैष्णवी शिंदे यांनी पर्स तपासली असता, त्यातील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरीला गेलेल्या एकूण १२ तोळे दागिन्यांमध्ये ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅमचे जास्वंदीच्या फुलाचे डिझाईन असलेले गंठण, नेकलेस, सोन्याच्या दोन बांगड्या, सोन्याची चेन, पेंडंट असलेली बॉक्स चेन आणि कानातील कुड्या अशा मौल्यवान ऐवजाचा समावेश आहे. या घटनेनंतर वैष्णवी शिंदे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२०२६ नुसार दाखल केला आहे. चिपळूण बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भरदुपारी एवढ्या मोठ्या रकमेचे दागिने चोरीला गेल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *