GRAMIN SEARCH BANNER

काळबादेवी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी: तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाकडी दांडक्याने हल्ले केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. या वादात तिन्ही भाऊ जखमी झाले असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींनुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली तक्रार संतोष प्रभाकर मयेकर (४९) यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी ७:४० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोठा भाऊ राकेश प्रभाकर मयेकर हा हातात दांडका घेऊन घराच्या अंगणात आला. बांधकामाला विरोध केल्याच्या रागातून राकेशने संतोष यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपीने अंगणातील दुचाकी (MH08 AA 2161) ढकलून देऊन नुकसान केले आणि जमिनीच्या हद्दीवर लावलेले सिमेंटचे पोल तोडून टाकले. एवढेच नव्हे तर घरात घुसून जमिनीची खरेदीखते चोरून नेल्याचा आणि आईला ढकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात राकेश मयेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, राकेश प्रभाकर मयेकर (५१) यांनीही आपल्या दोन भावांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. राकेश यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कामाला जात असताना जगदीश प्रभाकर मयेकर (५५) आणि संतोष प्रभाकर मयेकर या दोन्ही भावांनी त्यांना अंगणात अडवून बांधकामाचा मडगा तोडण्यास सांगितले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता संतोषने धक्काबुक्की केली, तर जगदीशने पाठीमागून येऊन लाकडी दांडक्याने राकेशच्या पाठीवर आणि डाव्या हातावर वार करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी संतोष आणि जगदीश मयेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही बाजूंनी दांडक्याचा वापर आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने नवानगर परिसरात तणावाचे वातावरण असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3488046
Share This Article