कुरधुंडाजवळ रस्ता कामातील दगड लागून सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज जखमी; ठेकेदाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावननदी ते आरवली दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव असल्याने अपघाताच्या घटना वाढत असून, अशाच एका घटनेत सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांना कामातून उडालेल्या दगडांमुळे गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी आणि त्यांच्या जनरल मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कुरधुंडा येथे काळ्या दगडाचा डोंगर मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना अनेकदा दगड अस्ताव्यस्त उडतात.दुचाकीवरून जात असताना रमजान गोलंदाज यांना वेगाने आलेले दगड लागले. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव सुरू झाला होता, तर हातालाही मुका मार लागला. नशिबाने ते थोडक्यात बचावले, कारण हाच दगड डोक्याला किंवा डोळ्याला लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, असे उपस्थितांनी सांगितले. त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
रमजान गोलंदाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरधुंडा येथील बँक ऑफ इंडियासमोर जे. एम. म्हात्रे कंपनीकडून महामार्गाचे काम सुरू असताना पोकलँडच्या साहाय्याने डोंगर फोडण्याचे काम केले जात होते. याचवेळी वेगाने उडालेला एक दगड त्यांच्या पायाला, तर दुसरा हाताला लागला. या घटनेने ते चांगलेच गरगरले आणि त्यांनी आपली दुचाकी थांबवली.
या बेपर्वाईने सुरू असलेल्या कामावर रमजान गोलंदाज यांनी आक्षेप घेतला आणि काम तात्पुरते थांबवण्यास भाग पाडले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कामाच्या ठिकाणी संरक्षण म्हणून पत्रे किंवा जाळी लावण्याची विनंती त्यांनी कंपनीचे जनरल मॅनेजर हलशेठ यांना केली. मात्र, हलशेठ यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत, “तुला कोणाला बोलायचे आहे त्याला बोल, माझे कोणी काहीही करू शकणार नाही,” अशी धमकी दिल्याचे गोलंदाज यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
जनतेच्या सुरक्षिततेबाबत ठेकेदार कंपन्यांकडून होणाऱ्या या हलगर्जीपणाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.