मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याला १२ नवे भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी मिळणार आहेत. गृह विभागाने या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे अधिकारी ३१ ऑगस्टपासून महाराष्ट्र संवर्गात रुजू होणार आहेत.
प्रशिक्षणानंतर या अधिकाऱ्यांना राज्यातील विविध भागांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या नियुक्त्यांमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
नियुक्तीच्या आदेशानुसार अरांक्षा यादव यांची रत्नागिरी येथे, गुरव गंगाधर कायांदे पाटील यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे, तर कुमार सुशांत यांची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मेघना आय. एन. यांच्याकडे लातूर ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली असून राहुल कुमार यांची परभणी शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल रमेश आत्राम यांची वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे, तर सागर संजय भामरे यांची गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे पदस्थापना झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरची जबाबदारी ईशानी आनंद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जान्हवी बाळासाहेब शेखर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे, तर सारदा तेजस सुदिप यांची भंडारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. शशांत एन. एम. यांना नागपूर ग्रामीणमधील कामठी आणि सुयश कुमार सिंग यांना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे जबाबदारी देण्यात आली आहे.
या १२ अधिकाऱ्यांपैकी सहा अधिकारी २०२३च्या तुकडीतील, तर उर्वरित सहा अधिकारी २०२४च्या तुकडीतील आहेत. प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करून आता या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पोलीस प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासह स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेचे कामकाज हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. ३१ ऑगस्टपासून संबंधित ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष सेवेला सुरुवात होणार आहे.
रत्नागिरीसह महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचाही समावेश, ३१ ऑगस्टपासून पदभार
Leave a Comment






