मुंबई: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले.या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. अद्यापही अनेक ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. मध्य पूर्वेतील देशांमधील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. यातच भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धेसाठी जाताना दुबई विमानतळावर अडकली. एका सुरक्षित ठिकाणाहून पी.व्ही.सिंधू हिने त्या ठिकाणी घडलेला थरारक प्रसंग शेअर केला आहे.पी.व्ही.सिंधू हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, दुबई विमानतळावर घडलेली आपबीती सांगितली आहे. या व्हिडिओत पी.व्ही.सिंधू म्हणते की, मला एक अपडेट शेअर करायची आहे. सर्वप्रथम आमच्याशी संपर्क साधणाऱ्या आणि आमची काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. मी बेंगळुरूहून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी यूकेमधील बर्मिंगहॅमला जात होतो. आमचे विमान दुबईत उतरल्यानंतर सर्व परिस्थिती बिकट झाली. आमच्या नियंत्रणाबाहेरील घटना घडू लागल्या. अवघ्या काही तासातच हवाई क्षेत्र बंद करण्यात आले, अशी माहिती पी.व्ही.सिंधू हिने दिली.अगदी जवळ एक स्फोट झालागेल्या काही तासांपासून खूप तणाव होता. आम्हाला विमानांचे आवाज ऐकू येत होते. काही तासांनंतर दुबई विमानतळावर आम्ही जिथे अडकलो होतो, त्याच्या अगदी जवळ एक स्फोट झाला. माझे प्रशिक्षक त्या ठिकाणापासून जवळजवळ १०० मीटर अंतरावर होते. त्याला लगेच त्या भागातून बाहेर पडावे लागले. इतक्या जवळच्या ठिकाणी असे काहीतरी अनुभवणे खरोखर हादरवून टाकणारे होते. तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या कोणाशीही अशा गोष्टी घडतील, अशी तुम्ही कधीच अपेक्षा करत नाही. परंतु कधीकधी परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. माझ्यासोबत मजबूत आणि एकजूट टीम असल्याने मी खूप भाग्यवान समजते. प्रत्येकाने संयम दाखवला. एकमेकांना पाठिंबा दिला. अतिशय भयानक परिस्थितीत खरी ताकद दाखवली, असे पी.व्ही.सिंधूने म्हटले आहे.आत्ता आम्ही सुखरूप आहोत आणि सुरक्षित ठिकाणी आहोत. दुबईतील भारतीय उच्चायुक्तांनीही मोलाचे सहकार्य केले. आम्ही अडकले आहोत, याची माहिती मिळताच त्यांनी वेगाने पावले उचलली आणि आम्हाला मदत केली. केवळ आम्हाला नाही, तर इथे अडकलेल्या बाकीच्यांनाही मदत मिळवून दिली. या कठीण परिस्थिती ते सातत्याने आमच्या संपर्कात होते. परिस्थिती सामान्य होण्याची आम्ही सगळे जण वाट पाहत आहोत. सगळ्यांना पुन्हा धन्यवाद, असे पी.व्ही.सिंधूने सांगितले.दरम्यान, दुबई विमानतळावरील सर्वच कर्मचारी अखंडपणे न थकता सगळ्यांची काळजी घेत आहेत. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करत आहेत. इथे शेकडो जण अडकले आहेत. या सर्वांची काळजी येथील कर्मचारी अव्याहतपणे घेत आहेत या सर्वांना धन्यवाद देते, असेही ती म्हणाली.
“१०० मीटरवर मोठा स्फोट झाला अन्”; पी.व्ही.सिंधूंने सांगितला दुबई विमानतळाचा थरारक घटनाक्रम






