प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपेक्षित पैसा न मिळाल्याने पती, पत्नीने केला खून
खेड : पोलादपूर पोलिसांनी ३० एप्रिल रोजी सापडलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यातील दोन आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून कर्नाटक सीमावर्ती भागात लपून राहत होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. सुनील दादा हसे (वय ५४, रा. अंबड, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. वंदना दादासाहेब पुणेकर (३६, रा. जयसिंगपूर, ता. कोल्हापूर) आणि तिचा पती मोहन पांडुरंग सोनार (५४, रा. बोरसूत, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२५ रोजी जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दरी भागात एक अज्ञात पुरुषाचा सडलेला मृतदेह काँक्रीट संरक्षक भिंतीपलीकडे आढळून आला होता. हा मृतदेह सुमारे दोन-तीन दिवसांचे कुजलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या घटनेची माहिती भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक रावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचनामा करून तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे केवळ चार दिवसांत पोलादपूर पोलिसांनी अक्षय जाधव या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीची ओळख सुनील दादा हसे (वय ५४, रा. अंबड, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) अशी पटली.
तपासादरम्यान सुनील हसे यांच्या खुनामागे वंदना दादासाहेब पुणेकर आणि तिचा पती मोहन पांडुरंग सोनार यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सुनील हसे हे वॉक्सवॅगन कार (एमएच १५ डीएस ८००५) भाड्याने देऊन स्वतः चालवत उपजीविका करत होते. गाडीत लिफ्ट देताना त्यांची ओळख वंदना पुणेकर हिच्याशी झाली. सुनील हसे श्रीमंत असल्याचा समज झाल्याने तिने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर डोळा ठेवला. मात्र अपेक्षित पैसा न मिळाल्याने वंदनाने आपल्या पतीच्या मदतीने त्यांचा खून करण्याचा कट रचला. २७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्यांनी सुनील हसे यांना गुंगीचे औषध देऊन गाडीतच गळा आवळून ठार मारले आणि मृतदेह कशेडी घाटात दरीत टाकून दिला.
घटनानंतर वंदना आणि मोहन हे दोघे कर्नाटक सीमावर्ती भागात फरार झाले होते. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलिसांच्या पथकाने या दोघांना अटक केली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पो.ह. तुषार सुतार, पो.ना. अनुजित शिंदे आणि महिला पोलीस शिपाई बनसोडे यांचा समावेश होता.
या खुनाच्या प्रकरणात पोलादपूर पोलिसांनी केवळ मृतदेहाची ओळख पटवून तपासाची दिशा स्पष्ट केली नाही, तर तीनही आरोपींना अटक करून संपूर्ण कटाचा उलगडा केला आहे. कशेडी आणि आंबेनळी घाटातील अशा प्रकारच्या घटनांवर आता अंकुश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या यशस्वी तपासाबद्दल तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
दरम्यान, वंदना पुणेकर आणि मोहन सोनार यांच्याविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
खेडमधील कशेडी घाटातील खुनाचा उलगडा; संगमेश्वरमधील प्रौढासह कोल्हापुरातील महिलेला अटक
