रत्नागिरी : शहरालगतच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. धनश्री दीपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवार, ८ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ वर्षे होते. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या व कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
धनश्री सनगरे हसतमुख, मनमिळावू व सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. त्यांनी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीच्या अनेक उपक्रमांना चालना मिळाली. निवृत्तीनंतरही त्या विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांत सक्रिय होत्या.
त्यांच्या निधनामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या शिरगाव तिवंडेवाडी येथील दीपक नारायण सनगरे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती व दोन मुलगे असा परिवार आहे.
मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला नातेवाईक, ग्रामस्थ, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरगावच्या माजी सरपंच धनश्री सनगरे यांचे निधन
