टँकर अडकला, अनेक वाहने वाहून गेल्याची भीती
गुजरात : वडोदरा आणि आणंद या शहरांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल मंगळवारी सकाळी अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत पूलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली असून, तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेच्या वेळी पूलावर एक टँकरदेखील होता. पूल कोसळल्यानंतर हा टँकर अर्धवट लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सदर टँकर कधीही नदीत कोसळू शकतो, त्यामुळे घटनास्थळी अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे. बचावकार्याच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
या दुर्घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पूल कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या पुलाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कृपया या भागात गर्दी करू नये आणि बचावकार्यात अडथळा आणू नये.