खेड : तालुक्यातील खासदार सुनील तटकरे यांच्या सासरवाडीकडे जाणाऱ्या, गेल्या वर्षीच बांधलेल्या फुरूस-पोयनार रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षीच हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, वर्षभरातच रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या भगदाडाखाली मोठे भुयार तयार झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला असून, अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
फुरूस हे खेड-दापोली मुख्य मार्गाला जोडलेले असून, पोयनार गावाकडे जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. पोयनार हे खासदार सुनील तटकरे यांची सासरवाडी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हा रस्ता ‘व्हीआयपी’ दर्जाचा मानला जातो. असे असतानाही, वर्षभरातच रस्त्याची ही दुरवस्था झाल्याने, कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची ही अवस्था झाल्याने, आगामी काळात नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारामुळे विकासकामांच्या दर्जाची पोलखोल झाली असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वर्षभरातच खेडमधील फुरूस-पोयनार रस्त्यावर मोठे भगदाड
